हंसराज, भंडारा/गोंदिया :- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने सत्तेचा माज दाखवत पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेचा अतोनात गैरवापर केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस चे नेते नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सरकारकडून ‘जंगलराज’ चालवण्याचा प्रयत्न होत असून, याच दबावामुळे महाविकास आघाडीचे प्रफुल अग्रवाल आणि आमदार दिलीप बनसोड यांनी आपले नामांकन मागे घेतले असल्याचे पटोले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, या बदलत्या परिस्थितीत महाविकास आघाडीने आता अपक्ष निवडणूक लढवणारे नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
उमेदवारांना धमकावण्याचे सत्र नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल करताना सांगितले की, “या निवडणुकीत प्रफुल अग्रवाल, दिलीप बनसोड आणि नरेश ईश्वरकर या तिघांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, हे नामांकन मागे घेण्यासाठी सरकारकडून सर्व स्तरावर दबाव टाकण्यात आला. ३० तारखेला प्रफुल अग्रवाल यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली, तर गोंदियाचे नगराध्यक्ष शेंडे यांना ईडीची (ED) धमकी देण्यात आली. अखेर या दडपशाहीला बळी पडून अग्रवाल आणि बनसोड यांनी माघार घेतली.”
मध्यरात्रीपर्यंत पोलीस अधीक्षकांचा डेरा दुसरे उमेदवार नरेश ईश्वरकर यांच्यावर खोट्या केसेस लावून प्रशासनाकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. “३१ तारखेला फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी ईश्वरकर यांना नोटीस बजावून १ तारखेला दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. धक्कादायक म्हणजे, स्वतः पोलीस अधीक्षक (SP) फौजफाट्यासह रात्री १ वाजेपर्यंत मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते. हा सर्व प्रकार केवळ ईश्वरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठीच करण्यात आला,” असा खणखणीत आरोप पटोले यांनी केला.
मविआचा आता नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा या राजकीय घडामोडीत एक मोठी वळण पाहायला मिळाले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रफुल अग्रवाल यांनी माघार घेतल्याने आता रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. ईश्वरकर हे सध्या भंडारा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग सभापती असून ते अजित पवार गटाशी संबंधित असले, तरी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. आता त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीची ताकद उभी करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
सत्ताधाऱ्यांच्या या दडपशाहीची आणि लोकशाहीविरोधी कृत्याची सर्व माहिती जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने निष्पक्ष काम करण्याऐवजी सरकारचे हस्तक म्हणून काम केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.



