spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुकाराम मुंढेंनी जारी केला हेल्पलाइन नंबर आणि ई-मेल,भेसळखोरांवर मुंढेंचा दणका; ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक

मुंबई :- राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच भेसळयुक्त अन्न आणि औषधांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा वेग वाढवला असून अवघ्या सहा दिवसांत राज्यभरात २०३ छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत १०२ जणांना अटक करण्यात आली असून जवळपास ६८ दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत.

आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा देत तुकाराम मुंढे यांनी कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी विशेष हेल्पलाइन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भेसळ, गुटखा आणि औषधांबाबत येथे करा तक्रार

अन्नपदार्थ, मिठाई, औषधे किंवा प्रतिबंधित गुटखा-पानमसालासंदर्भातील तक्रारींसाठी नागरिक खालील माध्यमांचा वापर करू शकतात –

टोल फ्री क्रमांक : 1800-222-365

ई-मेल : [jc-foodhq@gov.in](mailto:jc-foodhq@gov.in)

नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ, भेसळयुक्त वस्तू किंवा बेकायदेशीर गुटखा विक्रीबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धुळ्यात १८.५० लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने ४ जून रोजी धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरून या मालाची वाहतूक होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत **१८ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त** करण्यात आला. या प्रकरणी राजस्थान येथील चालक **सुरेश कुमार गोवरिया** याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 २५ मे रोजी स्वीकारला पदभार

अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार त्यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कारभारात पारदर्शकता आणण्यासोबतच प्रतिबंधित गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि निकृष्ट औषधांविरोधात राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Popular Articles