कामठी :- रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी परिवारासह कन्हान नदीच्या तीरावर गेलेल्या दोन कुटुंबांवर आज काळाने घाला घातला. कामठी जवळील कन्हान नदी काठावरील महादेव घाट येथे पिकनिकसाठी आलेल्या नागपूर आणि कामठी येथील दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील एका ६ वर्षीय चिमुरड्यासह तिघांचा नदीच्या खोल डोहात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे:
१. रोहित महादेव नागदेव (वय ३५ वर्षे, रा. कुंभारे कॉलनी, कामठी)
२. गौतम राजकुमार अंबादे (वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जरीपटका, नागपूर)
३. चैतन्य बबलू अंबादे (वय ६ वर्षे, रा. जरीपटका, नागपूर)
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारे कॉलनी कामठी येथील रोहित नागदेव हा कुटुंबासह महादेव घाटावर पिकनिकसाठी गेला होता. त्याच वेळी नागपूरच्या जरीपटका येथील अंबादे परिवार देखील ३ महिला, ३ मुली आणि ३ पुरुषांसह याच ठिकाणी आले होते.
दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान, जरीपटका येथील के.जी. १ मध्ये शिकणारा ६ वर्षीय चिमुरडा चैतन्य अंबादे हा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी उतरला. खेळता खेळता त्याचा पाय घसरला आणि तो तेथे असलेल्या एका मोठ्या डोहात बुडू लागला.
चैतन्यला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे याने तात्काळ डोहात उडी घेतली. मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. हा गंभीर प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेव यांच्या लक्षात आला. रोहित यांनीही त्या दोघांना वाचवण्यासाठी डोहात धाव घेतली, परंतु दुर्दैवाने पोहता येत नसल्याने रोहित सुद्धा त्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.
या तिघांना बुडताना पाहून गौतमचे वडील राजकुमार अंबादे (वय अंदाजे ५५) हे देखील नदीत उतरले. तेही मानेपर्यंत पाण्यात बुडाले होते, परंतु त्यांनी निकराची झुंज देत कसेतरी हातपाय मारून स्वतःचे प्राण वाचवले आणि ते पाण्याच्या बाहेर आले.
घटनेची माहिती मिळताच जुना कामठी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर आणि पोलीस उपनिरीक्षक सागर भंडारी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः नदीच्या डोहात उतरून शोधमोहीम राबवली आणि तिन्ही मृतांचे शव पाण्याबाहेर काढले.
या घटनेमुळे कामठी आणि नागपूरच्या जरीपटका परिसरात शोककळा पसरली आहे. जुना कामठी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







