– एकाच दिवशी ४४ ठिकाणी छापे; दारू माफियांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मोठा प्रहार
हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यात अवैध हातभट्टी, दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलिसांनी शनिवारी ‘ऑपरेशन वॉश आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या नेतृत्वात राबविलेल्या या धडक कारवाईत १८ लाख १३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण ४४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
३८० पोलीस कर्मचाऱ्यांचे ताफा मैदानात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ६ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात ही शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी असे एकूण ५५ अधिकारी आणि ३२५ पोलीस अंमलदार अशा ३८० जणांच्या फौजेने विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.

मोहाफूल रसायनाचा मोठा साठा नष्ट या कारवाईत पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल ८,४३३ किलो मोहाफूल रसायन जप्त केले, ज्याची किंमत १६ लाख ४७ हजार ५०० रुपये आहे. याशिवाय २२७ लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत ६४,९०० रु.), दारू गाळण्याचे व वाहतुकीचे साहित्य (किंमत १,४६,८२० रु.) आणि देशी-विदेशी दारू असा एकूण १८ लाख १३ हजार रुपयांहून अधिकचा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ४४ गुन्हे नोंदवून आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील अवैध दारू, अंमली पदार्थ आणि जुगार यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरूच राहणार आहे. कोणताही बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन “नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास त्याची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली.







