किशोर साहू, मौदा :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी पावडदौना येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात भक्ती भावाने आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षी ६ जून हा दिवस अखंड हिंदुस्तानात शिवस्वराज्य व राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शेकळो मशालीच्या प्रकाशात पंचामृत दुधाने राज्यभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्या आनंद सोहळ्यात सुप्रसिद्ध सप्तखंजिरी वादक, राष्ट्रीय प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांच्या प्रबोधनाने शिवरायांच्या कार्याला स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाला वंदन केले. 

या कार्यक्रमात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल ,रामटेक नगरपालिकेचे नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन,जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, पावडदौना ग्रामपंचायतीच्या सरपंचा शीला नितेश वांगे,बा रायगड परिवाराचे विभाग प्रमुख श्रीधर वडे, महिला शहरप्रमुख वंदना बुराडे,ग्रामपंचायतचे सदस्य दशरथ बोंबाटे,निलेश हिरेखन ,भाऊराव केवट, शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सदस्य सतीश ठाकरे, मंगेश ठाकरे, कमलेश रोडे,योगेश ठाकरे, दुर्गेश वैद्य,सुहानी ढोबळे,राहुल सोमनाथे,निखिल कडू आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास गावकऱ्यांनी एकत्रित येऊन शिवरायांच्या विचारांचे स्मरण केले आणि त्यांच्या आदर्शावर चालन्याचा संकल्प घेतला. या कार्यक्रमात प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तसेच नव्याने पोलीस दलात दाखल झालेल्या युवकांचा व त्यांच्या आई-वडिलांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. भगव्या ध्वजाच्या साक्षीने आणि शिवरायांच्या जयघोषात हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवभक्तांच्या व नितेश वांगे मित्रपरिवार शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहभाग आणि शिवरायांविषयीची श्रद्धा यामुळे पावडदौना नगरी शिवमय झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या गौरव स्वराज्यांच्या अभिमान आणि समाजात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे आणि मित्र परिवाराने केले होते.







