– भुरालटेक ते दुलारा रस्ता अंत्यंत दयनीय
सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील देवलापार परीसरातील अनेक रस्त्याची दुर्दशा झाली असून परीसरातील अनेक रस्ते उखडले असून त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अनेक मार्ग उखडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये भूरालटेक ते दुलारा-छवारी, सालई ते पिपरिया व सालई ते घोटी या रस्त्यांचा समावेश असून अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध सिल्लारी जंगल सफारी गेट असलेल्या पवनी ते पिपरीया मार्गाचीही दुरवस्था झाली असून पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामार्गाकडे विभागाचे मुळीच लक्ष दिसून येत नाही. याशिवाय सिंदेवानी ते खिडकी, घोटी रमजान ते सालई, गर्रा ते खुर्सापार, मानेगाव ते गर्रा, पवनी ते पिपरिया, पथरई ते घोटी, सालई ते हिवरा (पथरई), घोटी ते जंगली फुलझरी यासह परीसरातील ६० टक्के पेक्षा जास्त रस्त्याची परीस्थीती गंभीर दिसत असून उखडले आहे. हे रस्ते जंगलाला लागून असून, या भागात वाघ व इतर वन्यजिवांचा मोठा वावर आहे. यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परीसरात सर्वच खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या धोका वाढला असून, भीतीचे सावट आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.








