कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळून लावत सराईत चोरट्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई माँ चंडिका नगर परिसरातील आनंदसागर लॉनजवळ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीट मार्शल पोलीस शिपाई संजू ठाकरे व शशिकांत पटोले हे रात्री पेट्रोलिंग करत असताना एका बंद घरात संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यांनी तात्काळ रात्रपाळीचे अधिकारी पीएसआय पवार यांना घटनास्थळी बोलावले. पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडलेले असून दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले.
दुचाकीच्या क्रमांकावरून नाकाबंदी अॅपच्या सहाय्याने घरमालकाचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. घरमालक बाहेरगावी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराला वेढा घातला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात लपून बसलेल्या चोरट्याला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजीनगर वॉर्ड क्र. 2, राळेगाव, जि. यवतमाळ) असे असून तो मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमधील सराईत आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडून पांढऱ्या धातूच्या दोन पायपट्ट्या, एक ब्रेसलेट, पिवळ्या धातूचा नेकलेस व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीवर यापूर्वी जरीपटका, पाचपावली, सीताबर्डी व अजनी पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट व इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
बीट मार्शल कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली असून आरोपीविरुद्ध पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली.







