– महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी INFOCEPT चा पुढाकार; TCPC सिलाई स्कूलचे उद्घाटन
नागपूर :- ग्रामीण भागातील महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने INFOCEPT च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत ‘ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटर’ (TCPC) सिलाई स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम AFARM, पुणे आणि निसर्ग विज्ञान मंडळ (NiViM), नागपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन INFOCEPT चे संचालक दिनेशकुमार गर्ग यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर फर्स्ट फाउंडेशनचे अध्यक्ष तनवीर मिर्झा, MIHAN SEZ नागपूरचे सहाय्यक विकास आयुक्त जी. एस. भंडारी, INFOCEPT चे CSR प्रमुख सुनील नरवरे, CSR लीड रिमाचंद काले तसेच CROWDERA चे संचालक क्षितिज इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात AFARM च्या वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक (नेटवर्किंग) सौ. वैशाली गवांदी यांनी प्रकल्पाची संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. उषा सिलाई मशीनचे सेल्स मॅनेजर परेश वाघमारे यांनी शिवणकला हे महिलांसाठी उपजीविकेचे प्रभावी साधन कसे ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमात निवड करण्यात आलेल्या २५ प्रशिक्षणार्थी महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षक वेगड यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली. यावेळी INFOCEPT च्या CSR टीममधील राहुल व अभिषेक, निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय घुगे, प्रविण देशमुख, मुन्ना महाजन तसेच TCPC प्रशिक्षण समन्वयक भूमिका निकम यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमांतर्गत महिलांना २५ दिवसांचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर ९० दिवसांचे प्रत्यक्ष सराव सत्र (दररोज पाच तास) आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे सहभागी महिलांना व्यावसायिक दर्जाचे टेलर म्हणून घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि उत्पन्ननिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील उपजीविका अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. INFOCEPT, AFARM आणि NiViM यांचा हा संयुक्त उपक्रम महिला सबलीकरण, कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविका निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.








