– रामकृष्ण सहस्रबुद्धे आणि माया शर्मा यांचाही गौरव
नागपूर :- नवरात्रोत्सवानिमित्त यशोधरा सेलिब्रेशन लॉन येथे ‘रास गरबा २०२६ – सीझन ८’ चे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कवयित्री मंजुश्री पुष्प कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पुष्पांजली फाउंडेशनतर्फे संपादन, साहित्य आणि काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल संपादक व राष्ट्रीय कवी सुदर्शन चक्रधर तसेच गझलकार शादाब अंजुम यांना ‘राष्ट्रीय साहित्यिक सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.
भारतीय तैलिक साहू राठौर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश नंदलाल साहू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सन्मान सोहळ्यात रामकृष्ण सहस्रबुद्धे यांनाही ‘राष्ट्रीय साहित्यिक सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माया शर्मा यांचा गौरव करण्यात आला. पुष्पांजली फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू कारेमोरे आणि भारतीय तैलिक साहू राठौर महासभेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक सहभागी आणि मान्यवर उपस्थित होते.
‘रास गरबा’चा जल्लोष; सहभागी कलाकारांनी उधळले रंग
निधी कारेमोरे आणि कोमल अंबाडे यांच्या आयोजनाखाली ‘रास गरबा २०२६ – सीझन ८’ हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नवदुर्गा एक्ट, गरबा रनवे आणि समूह गरबा स्पर्धा ही कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे ठरली. पारंपरिक वेशभूषा आणि मनमोहक नृत्याविष्कारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी माधुरी धीरज बंसोड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर रुची दत्ता आणि श्रीजॉय दत्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहल दाते, डॉ. रश्मी सांगळ तिरपुडे आणि आभा ढोबळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती मंजू कारेमोरे यांचे विशेष योगदान लाभले.








