spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहेत – संजय राऊत

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देशातील राजकीय स्थिती, काँग्रेसचं राजकारण, अयोध्येतील राम मंदिरातील दान पेटीतील पैशांची चोरी प्रकरण यावर भाष्य केलं. याशिवाय मनसे हा स्वतंत्र पक्ष असून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष नसून ते गट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसह लवकर अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं.

काँग्रेसला मजबूत करण्याची गरज

संजय राऊत म्हणाले की मी कोणत्याही पक्षाचं व्यक्तीश नाव घेऊन बोलत नाही. सध्या जी लोकशाहीची, संविधानाची आणि देशातील इतर संस्थांची बारा वर्षातील स्थिती पाहता काँग्रेस पक्ष अधिक मजबुतीनं समोर आला पाहिजे. राहुल गांधी तसा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमधून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी, अशी भूमिका मी मांडली होती. आता यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली, काही हालचाली सुरु झाल्या त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही राऊत यांनी म्हटलं.

अयोध्येच्या दानपेटीतील पैशांची चोरी धक्कादायक

संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरात, श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे. 5 कोटींचा अपहार हे एक प्रकरण समोर आलं आहे. प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरात रामाच्या मंदिराच्या दानपेटीला हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्त्ववादी करु शकला? तुम्ही उठसूठ अतिरेक्यांपासून राम मंदिराला धोका आहे म्हणता, मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारे अतिरेकी कोण आहेत. नंतर लक्षात आलं तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था भाजप आणि आरएसएसच्या परिवाराकडे आहे. मग हे घरातले चोर आहेत का? दरोडेखोर आहेत का? नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला बारा वर्ष झाली आहेत, ज्यांनी एक मोठा सोहळा केला होता, मंदिरात बसून तप केलं, त्या मंदिरात प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहेत, हे शंभर टक्के भाजपचे लोक आहेत. हे कळल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार : संजय राऊत

संजय राऊत यांनी पुढं म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. काल त्यांची आणि आमची चर्चा झाली, बहुतेक आपल्याला रामाचं बोलावणं आहे. अयोध्येत आम्ही यावं आणि त्या विषयाला तोंड फोडावं, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश राम मंदिर ट्र्स्टला दिला होता. राम मंदिराच्या दानपेटीचे चोर कोण? सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आलं? नरेंद्र मोदी या विषयावर का गप्प आहेत. ट्र्स्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा हे का गप्प आहेत. त्या भागातील भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी सांगितलं, माझ्याकडे पूर्ण माहिती आहे.पण ही मोठी माणसं आहेत, त्याबद्दल बोललो तर जीवाला धोका निर्माण होईल. बृजभूषण सिंह यांच्यासारख्या बाहुबलीला भीती वाटते हा अत्यंत गंभीर विषय आहे. आम्ही लवकरच अयोध्येला जाणार आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. हे लोकं राम मंदिरात चोऱ्या करु शकतात, तर निवडणुका चोरणं, मतं चोरणं, विजय चोरणं हे यांच्यासाठी काहीच नाही. यांना राम मंदिरातील दानपेटीतील 5 कोटी चोरताना भीती वाटत नसेल तर निवडणूक चोरणं, मतं चोरणं, ईव्हीएमचा ताबा घेणं, संविधान ताब्यात घेणं याचं त्यांना काहीच वाटणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिंदे गटाला पक्ष मानत नाही

संजय राऊत पुढं म्हणाले की शिंदे गटाला पश्चताप झाला असेल तर मातोश्रीचे दार उघडे आहेत. शिंदे गट पक्ष नाही, राज ठाकरे यांचा मनसे स्वतंत्र पक्ष आहे.

शिंदे गट किंवा अजित पवार गट हे पक्ष नाहीत या अमित शाह यांच्या सिस्टर कंपन्या आहेत. आम्ही न्यायालयाने निर्णय दिल्यावर मानू, असं संजय राऊत म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.