– अंबाझरी तलावातील कामाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांचे निर्देश
नागपूर :- पर्यावरणासाठी घातक असलेल्या अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पती निर्मूलनाच्या कामाची पाहणी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी (ता. 12) केली. जलपर्णी निर्मूलनच्या कामाला गती देण्यासाठी अंबाझरी तलावातील दोन्ही बाजूंनी अतिरिक्त पोकलेन मशीनचा वापर करावा व जलपर्णीचे निर्मूलन त्वरित करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले. आतापर्यंत अंबाझरी तलावातून ८० हजार टन जलपर्णी काढण्यात आलेली आहे.
या पाहणीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त अंकित, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता उज्वल लांजेवार मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोन स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या निर्देशानुसार पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनाची मोहिम मनपाने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचे निर्मूलन केले जात आहे. पोकलेन, वीड हार्वेस्टरच्या सहाय्याने दररोज ४०० टन जलपर्णी काढली जात आहे.
या कामाची नियमित पाहणी आयुक्तांकडून केली जात आहे. जलपर्णीचे काढून टाकण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. ज्या भागात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जागेवर पोकलेन व वीड हार्वेस्टरचा वापर करून जलपर्णीचे प्रमाण कमी करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी दिली.







