spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोर्शी तालुक्याला गारपिटीचा तडाखा; संत्रा उत्पादक शेतकरी संकटात!

– हिवरखेड महसूल मंडळात सर्वाधिक नुकसान !

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यात दिनांक 12 जून रोजी 4 वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस व जोरदार गारपिट झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. विशेषतः हिवरखेड महसूल मंडळातील दापोरी डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी पाळा मायवाडी भाईपूर यासह अनेक गावांमध्ये गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला असून संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अनेक ठिकाणी संत्र्यांची फळगळ झाली असून झाडांवरील फळांना गंभीर इजा पोहोचली आहे. काही भागांत गारपिटीमुळे झाडांच्या फांद्या तुटल्या असून आगामी हंगामावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो रुपयांचा खर्च करून संत्रा बागांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने आणि पिक विमा कंपन्यांकडूनही अपेक्षित मदत न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रशासनाकडे मागणी करताना सांगितले की, “गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ नुकसान अहवाल शासनाकडे सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत, विशेष अनुदान आणि विमा भरपाई देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

दरम्यान, हिवरखेड महसूल मंडळासह परिसरातील गावांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून, केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदत मिळावी अशी मागणी होत आहे. गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संत्रा उत्पादकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.