हंसराज,भंडारा :- ग्रामीण भागातील शेतकरी ट्रॅक्टरधारकांना शेतीच्या कामासाठी डिझेल खरेदी करताना ५ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपांपर्यंत ट्रॅक्टर घेऊन जावे लागत असल्याने अतिरिक्त डिझेल खर्च आणि आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवरून कॅन (डब्यांमध्ये) डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची तसेच ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
याअंतर्गत पेेट्रोलियम नियम, २००२ मधील तरतुदींचा विचार करून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी लागणारे डिझेल प्लास्टिकच्या बाटली किंवा कॅनमध्ये देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा किंवा आधारकार्ड यापैकी ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. एका शेतकऱ्याला एका दिवसात जास्तीत जास्त ४० लिटर डिझेल पेट्रोल पंपावरून देण्यात येणार आहे. असे लेखी आदेश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी निर्गमित केले आहे.
पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने पंप परिसरात नियमित गस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व पेट्रोल पंप चालकांनी आपल्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि शेतकऱ्यांना विक्री करण्यात आलेल्या डिझेलची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापकांची राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२ मधील नियम १९८ ते २०२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात पोलीस अधीक्षक, सर्व तहसीलदार, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संबंधित अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापकांना आवश्यक कार्यवाही व अनुपालनासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.







