कामठी :- पंचायत समिती, कामठी येथे “आमचा गाव – आमचाच विकास आराखडा” या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींना लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि गरजाधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाला गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले , विस्तार अधिकारी गावंडे , माजी सरपंच प्रांजल वाघ तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावांच्या विकासासाठी ग्रामसभेची भूमिका, स्थानिक गरजांचे सर्वेक्षण, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आणि विविध शासकीय योजनांचा समन्वय साधून विकास आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी प्रभावी नियोजन करण्याची दिशा मिळाली असून, ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.







