spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जळगाव हादरले! पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ; PSI निलंबित, कठोर कारवाईची मागणी

 

जळगाव, २९ : जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या चौकशीसाठी बोलावलेल्या तीन तरुणांचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी पोलीस ठाण्यातच अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर नाऱ्हेडाला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी चौकशीसाठी तीन तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. पीडित तरुणांच्या आरोपानुसार, नाऱ्हेडाने त्यांना अमानुष मारहाण केली, त्यांचे कपडे काढायला लावले आणि त्यानंतर परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने तात्काळ पाऊले उचलण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, केवळ निलंबनावर न थांबता, नाऱ्हेडावर गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर, त्याच्याकडून पुन्हा अशा प्रकारचा गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात असून, त्याच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular Articles