कामठी :- कामठी तालुक्यातील बिना रेतीघाटावर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार गणेश जगदाळे यांनी आज सकाळी 6 वाजता धाड टाकून 8 ब्रास वाळूसह एक वाहन जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू तस्करांकडून महसूल विभागाचे नुकसान करून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी महसूल विभागाच्या पथकासह बिना रेतीघाटावर छापा टाकला. यावेळी एमएच-34 बीजी-5567 क्रमांकाच्या वाहनातून कोणत्याही वैध परवान्याशिवाय 8 ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
महसूल विभागाने तत्काळ कारवाई करत वाहनासह वाळू जप्त करून वाहन खापरखेडा पोलीस ठाण्यात जमा केले. संबंधित वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 48 (7) व 48 (8) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार अमर हांडा आणि तालुका कृषी अधिकारी प्रदीप गंगावणे यांनी संयुक्तपणे केली.




