सावनेर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग परिवार सावनेर, मूकबधिर निवासी शाळा, गोतमारे गुरुकुल, महिला पतंजली समिती, महाराष्ट्र योग शिक्षक संघ तसेच माहेश्वरी मंडळ सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय परिसरात भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचे संचालन पतंजली योगपीठ हरिद्वार येथून प्रशिक्षित मुख्य योग शिक्षक तथा योग परिवार सावनेरचे संस्थापक किशोर ढुंढेले यांनी केले. यावेळी महिला पतंजली तालुका प्रभारी लता ढवळे, सहप्रभारी सुनीता पाल तसेच योग परिवार सावनेरच्या कविता पीसे यांनी शासनाने निर्धारित केलेल्या योग प्रोटोकॉलनुसार उपस्थितांना योगासने, प्राणायाम व विविध व्यायामप्रकारांचे मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, केवळ एका दिवसाचा योगाभ्यास करून त्याचे लाभ मिळत नाहीत. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे आवश्यक आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास योगाभ्यास केल्यास शरीर निरोगी राहण्यासोबतच मानसिक आरोग्यही सुदृढ राहते. सकारात्मक विचारसरणी विकसित होऊन दिवसभर उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
मुख्य योग शिक्षिका सुनीता पाल यांनी नियमित योगाभ्यासामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला.
कार्यक्रमाला श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण व तांत्रिक शिक्षण संस्था, रामनगर (नागपूर) चे अध्यक्ष प्रशांत डवले, सचिव नारायण समर्थ, सहसचिव डॉ. अमित चेडे, मूकबधिर निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे, गोतमारे गुरुकुलचे संस्थापक भाऊ गोतमारे, माहेश्वरी महिला मंडळाच्या रेणुका चांडक तसेच बंटी माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश दळवी, शेखर, डॉ. प्रमोद डोंगरे, अशोक आठवले, संजय मानकर, संदीप पीसे, चव्हाणे, ओमप्रकाश नगराळे, जयेंद्र नगराळे, किंकर, अरविंद कुशवाह, सुमन तभाने, आशा ढुंढेले, वनिता नगराळे, शिल्पा पीसे, पद्मा नाचनकर, दीपा तागडे, माधुरी बागडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच मूकबधिर निवासी शाळेचे शिक्षक संजय लुंगे, सुनील राठोड, विनोद घोलप, दुर्गा चेडे, ज्योती राऊत आणि कविता केलापुरे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
योग परिवार सावनेर, मूकबधिर निवासी शाळा, गोतमारे गुरुकुल, महिला पतंजली समिती, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि माहेश्वरी मंडळाच्या असंख्य सदस्यांनी उपस्थित राहून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला.




