हंसराज, भंडारा पालांदुर :- पालांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा तिरखुरी शेतशिवारात सुरू असलेल्या कोंबडा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कोंबडे, लोखंडी कात्या, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण ६३,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बोळगीर आणि त्यांच्या पथकाने तिरखुरी शेतशिवारात छापा टाकला. यावेळी अमोल ताराचंद झोडे (२७, रा. बारव्हा), चेतन गंगाधर ठाकरे (२५, रा. ओपारा), टिकाराम दामाजी ठवकर (३५, रा. पारडी/मुर्झा), जितेश झोडे (२५, रा. बारव्हा), गोलू मुद्दलकार (रा. ओपारा) आणि शंकर जानबा चाचेरे (६०, रा. तिरखुरी) हे कोंबडा जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून विविध रंगाचे ७ कोंबडे (किंमत ३,१७० रु.), ३ लोखंडी धारदार कात्या (१८० रु.), रोख ४५० रुपये आणि ६०,००० रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 36 AF 4803) असा एकूण ६३,८०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पालांदुर येथे अपराध क्रमांक १७०/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (मजुका) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स.पो.नि. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोळगीर व पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पालांदुर पोलीस करीत आहेत.




