spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर यांच्या उपस्थितीत मनपा क्रीडा विभाग आणि एचसीएल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

नागपूर :- महापौर निता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून नागपूर शहरात क्रीडा संस्कृतीला अधिक बळकटी देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग आणि एचसीएल फाउंडेशन यांच्यात रग्बी, फेन्सिंग (तलवारबाजी) आणि धनुर्विद्या यांसारख्या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणासाठी ‘खेलो नागपूर एक्सीलेंस सेंटर’ सुरू करण्याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर महापालिकेतर्फे आयुक्त डॉ. विपीन आणि एचसीएल फाउंडेशनतर्फे एसव्हीपी ग्लोबल सीएसआर व एचसीएल टेकच्या संचालिका डॉ. निधी पुंधिर यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, मनपाचे उपायुक्त  मंगेश खवले आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर उपस्थित होते. तसेच, एचसीएल फाउंडेशनचे एजीएम प्रिजो थारुक, मॅनेजर पियुष वानखेडे आणि स्पोर्ट्स एसपीओ शुभम नौटियाल उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या मनपा शाळेच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात सागर गौडिया (कबड्डी),मधू साहू (कबड्डी) गणेश गुजम (खो-खो), सरवरी फाले (फुटबॉल),प्रणय उपाय (अ‍ॅथलेटिक्स), गौरी नाथ (व्हॉलीबॉल) यांचा सत्कार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे नागपूरच्या विद्यार्थ्यांना आता रग्बी, फेन्सिंग आणि धनुर्विद्या यांसारख्या खेळांत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. यामुळे येणाऱ्या काळात नागपूरमधून अनेक ऑलिम्पिकवीर खेळाडू घडतील, असा विश्वास महापौर  निता ठाकरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी क्रीडा विकास संस्थेचे पंकज महाजन, अनस अख्तर, शुभम पालकर, गजानन ठाकरे, दीक्षित नेवारे, भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते.

Popular Articles