– महापौर निता ठाकरे यांचे बल्क वेस्ट जनरेटरच्या कार्यशाळेत निर्देश
नागपूर :- स्वच्छ भारत अभियानात नागपूर शहराचे मानांकन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या नियमांचे व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे अधिकार्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व नागरिकांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संयुक्त विद्यमाने शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणार्या बल्क वेस्ट जनरेटरची कार्यशाळा व तंत्रज्ञान प्रदर्शनी वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. विपीन, महाराष्ट् प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे, धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, कर आकारण व कर संकलन विशेष समितीच्या सभापती सरिता कावरे, मंगळवारी झोनच्या सभापती सीमा डवरे, नेहरूनगर झोनच्या सभापती सीमा ढोमणे, लक्ष्मीनगर झोनच्या सभापती लक्ष्मी यादव, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सहाय्यक आयुक्त, झोन अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने घन कचरा व्यवस्थापन 2026 नियम तयार केले आहे. त्यानुसार 100 किलोपेक्षा अधिक घनकचरा निर्माण करणार्या संस्था, प्रतिष्ठाने, हॉस्पीटल, मॉल, मंगलकार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांना या कचर्याचे स्त्रोताच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. या नव्या नियमांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणार्या संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या नव्या कायद्याची व्याप्ती, या कायद्यातील तरतुदी, कायद्यान्वये आलेल्या जबाबदाऱ्या व या कायद्याचा भंग करणाऱ्यावर करावयाच्या दंडात्मक कारवाईच्या संदर्भात विविध वक्त्यांनी तसेच पीपीटीच्या सादरीकरणातून यावेळी या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी नागपूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा उचलण्यासाठी येणार्या गाडीची पूर्वसूचना देण्यासाठी ॲपचा वापर करण्याची सूचना केली. शहरातील कचर्याची उचल करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची मनपाची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय नागपूर शहरा स्वच्छ करण्याची संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकत नाही. नागरिकांना प्रारंभ प्रेमाने समजावून सांगा. यानंतरही कायद्याचे उल्लंघन करून कचरा निर्माण करणार्यांवर दंडाची कारवाई करावी, असेही निर्देशही महापौर ठाकरे यांनी अधिकार्यांना दिले.
कचरा मुक्त शहर करू – आयुक्त डॉ. विपीन
नागपूर शहराला कचरा मुक्त शहर तयार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. लोकांना कचर्याच्या विल्हेवाटीसाठी सर्वंकष माहिती देण्यासाठी मनपातर्फे ॲप तयार करण्यात येईल. यात घरासमोर येणारे कचरा उचलणार्या वाहनाचा क्रमांक, कचरा संकलकाचा क्रमांक देण्यात येईल. शहराला स्वच्छ भारत अभियानात सर्वोच्च स्थानी आणण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून शहराला कचरा मुक्त करण्यासाठी संकल्प करण्यात येईल, असेही डॉ. विपीन यांनी सांगितले.
कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्यांचा सत्कार
शहरात विविध संस्था कचऱ्यावर यशस्वीपणे प्रक्रिया करून कचर्याच्या विल्हेवाट लावण्याचा यशस्वी प्रयोग करणाऱ्यांचा यावेळी विशेषत्वाने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे विकास तेलंग, टाटा कॅपिटलचे राजू रामटेके, होम फॉर एजेड अँड हँडीकॅप्डच्या इर्विन डिमेलो, सीपी क्लबचे आनंद केलवाडे, अशोक हॉटेल चे शुभम गुप्ता, मेहदीबाग कॉलनीचे मोहम्मद अली, ज्योतिबा माध्यमिक विद्यालयाच्या अरुणा कडू यांचा महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी शाल व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला.
नियमांना निर्बंध मानू नये – जयंत पाठक
पर्यावरण पूरक शहराची निर्मितीसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांना निर्बंध न मानता शहराच्या स्वच्छतेसाठी पर्यायाने समाजाच्या निरोगी निर्मितीसाठी हे नियम आवश्यक आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत या कार्यशाळेतील प्रशिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक जयंत पाठक यांनी सांगितले. पाठक यांनी केंद्र सरकारने 2026 मध्ये तयार केलेल्या घन कचरा व्यवस्थापन नियमांचे विस्तृत व अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्या संस्थांना म्हणजे बल्क वेस्ट जनरेटरना संकेतस्थळावर नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रतिक भरणे यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती रेखा सरोदे यांनी दिली.
यावेळी आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी स्वच्छ शहराची संकल्पना साकार करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.
माझा कचरा माझी जबाबदारी
हेमा देशपांडे यांनी पर्यावरणपूरक शहरासाठी सर्वांनी घन कचऱ्याची विल्हेवाट लावताना पुनर्वापर, पुनर्निमिती व पुनर्प्रक्रिया करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे माझा कचरा, माझी जबाबदारी या दृष्टीकोनातून नागरिकांनी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
तंत्रज्ञान प्रदर्शनी
यावेळी जीओ क्लेम, भूमी ग्रीन व एंजल महिला बचत गटाने प्रदर्शनी लावली होती. यात टाकाऊ वस्तूंचे घरपोच संकलन करण्याची सेवा उपलब्ध आहे. जिओक्लेमतर्फे पालेभाज्या व ओल्या कचर्याद्वारे बायोगॅस निर्माण करण्यात येते.
प्रारंभी या कार्यशाळेमागची भूमिका उपायुक्त राजेश भगत यांनी प्रास्ताविकातून मांडली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मानले.




