spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे होणार वितरण

– कृषी पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतिक – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

· २०२३ व २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर; राज्यातील १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकारी यांचा होणार सन्मान

मुंबई :- राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ व २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विकासासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार हे कृषी क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतीक असून नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे हा सोहळा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्विकार राज्यपाल यांनी केला असून त्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समिती बैठकीत पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून शासनाने त्यास मान्यता दिली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाने राज्यातील विविध विभागांमधून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पुरस्कारार्थ्यांची निवड केली आहे. १ जुलै २०२६ रोजी २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि शाश्वत कृषी विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व पुरस्कारार्थींनी राज्यासाठी आदर्श निर्माण केला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट), तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत. २०२३ व २०२४ साठी वरील पुरस्कारांसाठी एकूण १८९ पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात येणार आहे. निवड झालेल्या पुरस्कार्थींचे कृषीमंत्री भरणे यांनी अभिनंदन केले आहे.

Popular Articles