spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जगातील सर्वात लहान रोबोट आर्म तयार करून हितेन धारपुरे यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा विश्वविकम

नागपूर :- महाराष्ट्रातील स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट येथील १७ वर्षीय विद्यार्थी हितेन धारपुरे याने जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्म तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. त्याच्या या अभिनव संशोधनामुळे नागपूरसह महाराष्ट्राची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे. यापूर्वीही जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मचा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा यांच्या नावावर होता. त्यांनी तयार केलेल्या ४४.४९ मिमी (१.७५ इंच) आकाराच्या 3D- प्रिंटेड रोबोटिक आर्मने हा विक्रम प्रस्थापित केला होता. हितेन ने तयार केलेल्या रोबोटिक आर्मचे प्रमाणित मोजमाप केवळ ३९.२५० मिमी असून त्याने हा जागतिक विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला आहे. हितेनने विकसित केलेले हे उपकरण पूर्णपणे कार्यरत इलेक्ट्रोमेकॅनिकल रोबोटिक आर्म असून ते मानवी हाताप्रमाणे विविध गुंतागुंतीच्या हालचाली करू शकते. या आर्ममध्ये मायक्रो सर्वो मोटर्स आणि अचूक PWM कंट्रोल मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ते तीन स्वतंत्र अक्षांवर हालचाल करू शकते तसेच लहान वस्तू अचूकपणे पकडण्याची क्षमता त्यामध्ये आहे. या प्रकल्पासाठी हितेनने FDM तंत्रज्ञानाचा वापर करून कस्टम चेसिस डिझाइन केले आणि 3D प्रिंटिंगद्वारे त्याची निर्मिती केली. अतिशय मर्यादित जागेत सर्वो मोटर्स व वायरिंग अचूकपणे बसविण्याचे आवाहन त्याने यशस्वीपणे पेलले.

आपल्या यशाबद्दल बोलतांना हितेन धारपुरे म्हणाला, “मायक्रो- मॅन्युफॅक्चरिंगच्या भौतिक मर्यादा ओलांडून सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च- अचूकतेचे रोबोटिक्स विकसित करता येते, हे सिद्ध करणे हे माझे ध्येय होते. हा जागतिक विक्रम ‘विकसित भारत’ संकल्पनेतील माझे योगदान असून जागतिक दर्जाच्या नवकल्पना आपल्या घरातूनही साकार होऊ शकतात, हे यातून अधोरेखित होते.” संपूर्ण मॉडेल प्रगत CAD सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सुरुवातीपासून तयार करण्यात आले. जागेचा प्रत्येक मिलिमीटर प्रभावीपणे वापरत सूक्ष्म आकारात उच्च- अचूकतेचे रोबोटिक्स साध्य करण्याची क्षमता या प्रकल्पातून दिसून येते. तसेच सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगत STEM अनुप्रयोग विकसित करण्याचा हा एक उत्कृष्ट नमुना ठरला आहे. हितेन धारपुरे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या पिढीसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.