spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने ‘शस्त्रार्थ ३.०’ युवा संसदेचे आयोजन

– विदर्भातील पहिली युवा संसद; लोकशाही, नेतृत्व व धोरणात्मक चर्चेला चालना

नागपूर :- विदर्भातील अशा प्रकारची पहिली युवा संसद ‘शस्त्रार्थ ३.०’ नागपुरात आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा नेते, धोरणकर्ते आणि समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाची माहिती हिंमाशु बजाज यांनी पत्रपरिषदेत दिली. शस्त्रार्थ ३.० चे संस्थापक अध्यक्ष हिमांशू बजाज यांनी सांगितले की, हा उपक्रम भारतातील तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, सार्वजनिक चर्चेची संस्कृती आणि घटनात्मक जाणिवा विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. संसदीय कार्यपद्धतीच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या युवा संसदेत समकालीन राष्ट्रीय विषयांवर संरचित चर्चा, धोरणात्मक विचारमंथन आणि संसदीय सत्रांचे सिम्युलेशन करण्यात येणार आहे.

‘युथ रिव्होल्यूशन समिट’च्या पुढाकारातून पॉलिटिकल अड्डा आणि कल्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, माय भारत (मेरा युवा भारत) तसेच युनायटेड नेशन्स मेजर ग्रुप फॉर चिल्ड्रन अँड युथ (UNMGCY) यांचा पाठिंबा लाभला आहे. याशिवाय नागपूर शहर पोलीस, ऑपरेशन थंडर आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांचेही सहकार्य लाभत आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, विदर्भातील संस्थात्मक पाठबळ असलेली ही पहिली युवा संसद असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून बौद्धिक आदान- प्रदान, नेतृत्व विकास, सार्वजनिक भाषणकला, चिकित्सक विचार, नागरी सहभाग आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेत यशस्वी आयोजनासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारी यंत्रणा आणि युवा संघटनांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

Popular Articles