spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

हंसराज भंडारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय “सामाजिक न्याय दिन” तसेच नशामुक्त भारत अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता आयोजित समता दिंडीने झाली. सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून दिंडीला प्रारंभ केला. विविध शाळांतील विद्यार्थी, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सकाळी १०.३० वाजता झालेल्या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. देवसूदन धारगावे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, नगर परिषद अध्यक्षा माधुरी मदनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या कु. माहि ओमप्रकाश कोटांगले हिचा तसेच विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी विद्यार्थ्यांनी आणि समाजाने स्वप्रेरणेने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन केले. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देत समाजातील समतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षवल्ली तागडे यांनी तर आभार प्रदर्शन अंशिका सायरे यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.