पांढरकवडा :- गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनएल रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्याच्या नेटवर्कची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मोबाईलवर साधा कॉल लागत नाही, इंटरनेटचा वेग कासवगतीने चालतो, तर अनेक भागांमध्ये नेटवर्क पूर्णपणे गायब होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. डिजिटल इंड़िया, ऑनलाइन सेवा आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीच्या गप्पा मारणाऱ्या दूरसंचार कंपन्यांची प्रत्यक्षात मात्र, पांढरकवडा शहराबाबत घोर उदासीनता दिसून येत आहे. नेटवर्कच्या सततच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, ई-पीक पाहणी, सातबारा विविध शासकीय पोर्टल्सवरील कामे करतांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शिष्यवृत्ती अर्ज, स्पर्धा परीक्षा फॉर्म भरणे आणि इतर शैक्षणिक कामेही खोळंबली आहेत. शासकीय कार्यालयांतील ऑनलाइन व्यवहारांवरही याचा थेट परिणाम होत असून नागरिकांना वारंवार हेलपाठे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांकडून दरमहा हजारो कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या दूरसंचार कंपन्या सेवा सुधारण्यासाठी गंभीर नसल्याचे चित्र आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग आणि कंपन्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. प्रत्यक्षात समस्या सोड़वण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीत्र संताप व्यक्त होत आहे, दूरसंचार विभाग आणि संबंधित कंपन्यांच्या स्थानिक व्यवस्थापनाने आता झोपेचे सोंग सोडून वास्तवात उतरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली असून नेटवर्कच्या नावाखाली सुरु असलेली ही नागरिकांची उघड लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








