कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजनी येथील 69 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा अचानक प्रकृती बिघडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री 9 वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे नाव लक्ष्मी दुर्योधन भोयर (वय 69, रा. आजनी, ता. कामठी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी भोयर यांचा मुलगा, सून आणि नातीन हे भोयर कॉलेज चौक परिसरात अल्पोपहार करून घरी परतले. घरी आल्यानंतर लक्ष्मी भोयर यांना अचानक जीव मळमळू लागला व वारंवार उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना कामठी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान अवघ्या तीन तासांत त्यांची प्राणज्योत मालवली. या अनपेक्षित घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपासासाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




