हंसराज, कारधा/भंडारा :- प्राण्यांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आयसर ट्रकवर कारधा पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ बैलांची सुटका केली असून, ट्रकसह एकूण १८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत पोलीस शिपाई मेश्राम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, आयसर ट्रक क्रमांक एम.एच. ४० डी.सी. १३७७ मधून गोवंशाची तस्करी होत असल्याची खात्री पटली. पोलिसांनी सापळा रचून सदर ट्रक अडवला. झडती घेतली असता, ट्रकमध्ये अत्यंत अपुऱ्या जागेत १३ बैल (४ लालसर, ४ भुरके आणि ५ पांढऱ्या रंगाचे) आढळून आले.अंगावर काटा आणणारी क्रूरता ट्रकमध्ये बैलांना कोणत्याही चाऱ्या-पाण्याची व्यवस्था न करता, आखूड दोरखंडाने एकमेकांवर वाकडेतिकडे अवस्थेत कोंबून बांधले होते. या अमानवीय वाहतुकीमुळे जनावरांना प्रचंड वेदना व यातना होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ या बैलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. जप्त करण्यात आलेल्या १३ बैलांची किंमत ३ लाख २५ हजार रुपये आणि आयसर ट्रकची किंमत १५ लाख रुपये, असा एकूण १८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक विलास भीमराव कातडे (वय ३५), क्लिनर शुभम वसंता खंडारे (वय २७) आणि मालक मनोज अंबादास शेठे (वय ४८, तिन्ही राहणार शेलुबाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कडक कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपींविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात “या प्रकरणी पोलिसांनी अप.क्र. 577/2026 अन्वये पशु छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 11(1)(अ), (क), (ग), (ह), (फ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 119 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”
सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खाडे, पोलीस शिपाई मेश्राम व कारधा पोलीस चमुने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. खाडे करीत आहेत




