कामठी :- कामठी नगरपरिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्ष अजय रूपनारायण अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय घेण्यात आले.
बैठकीला मुख्याधिकारी विनोद जाधव, शिक्षण सभापती मनीषा नागपुरे, शिक्षण प्रशासन अधिकारी सुशांत जगताप यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्त, विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती आणि शाळांचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर देण्यात आला. शिक्षक व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे गणवेश उपलब्ध व्हावेत यासाठी नगरपरिषदेकडून प्रत्येक गणवेशासाठी अतिरिक्त आर्थिक योगदान देण्याची घोषणा नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी केली. याशिवाय दर्जेदार शूज व मोज्यांसाठीही आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात येणार असून, नगरपरिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे.
शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी इमारतींची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, स्वच्छतागृहे, खेळाची मैदाने, संरक्षक कंपाऊंड वॉल तसेच इतर आवश्यक विकासकामे प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच केजी (कॉन्व्हेंट पद्धतीच्या) वर्गातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्याची घोषणा करण्यात आली.
मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अंतर्गत बदल्यांचा प्रस्ताव मांडला. नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये एकसमान गणवेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षकांसाठीही स्वतंत्र ड्रेस कोड निश्चित करण्यात येणार आहे.
यावर्षी नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूलमध्ये इयत्ता नववीचा वर्ग सुरू करण्यात आला असून, त्या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक, मोफत गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली.
शाळांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी स्वच्छता विभागाला दिले.
बैठकीच्या शेवटी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी नगरपरिषदेच्या शाळा गुणवत्तेच्या बाबतीत आदर्श ठराव्यात, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात आणि पालकांचा नगरपरिषदेच्या शाळांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीतील निर्णयांमुळे कामठी नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




