– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा गौप्यस्फोट
मुंबई :- सचिन अहिर मूळ शिवसेनेत गेल्याचा सर्वाधिक आनंद जनाब संजय राऊत यांना झाला आहे. सचिन अहिर यांच्या पक्षाबाहेर जाण्याने आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला आहे. त्यामुळे सचिन अहिर यांनी सोडचिठ्ठी दिल्याबद्दल सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून येऊ शकत नाहीत हे राऊत ठाऊक आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे गट कमकुवत करण्यात संजय राऊत यशस्वी झाले, असा गौप्यस्फोट भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
माणसे ओळखण्यात चूक झाली, असे म्हणत संजय राऊत आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते वारंवार करताहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उबाठा गट आता पुढे जाऊ शकत नसल्याने उबाठा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कसे कमकुवत आहे हे प्रत्येक वेळेला ठासून सांगण्याचे काम संजय राऊतांकडून सुरु आहे, असे बन म्हणाले.
संजय राऊत तुम्ही इतिहासाची चिंता करू नका, असे म्हणत बन पुढे म्हणाले, पाठीत खंजीर खुपसण्याचा काळाकुट्ट इतिहास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्या नावावर कोरला गेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला नाकारून घरी बसवल्याने देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या नावावर इतिहासाचे सुवर्णपान आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे, महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करणे हे एकमेव ध्येय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे आहे तर पत्राचाळीत, एसआरएमध्ये घोटाळे करायचे, मराठी माणसाला देशोधडीला लावायचे हे तुमचे धंदे आहेत. त्यामुळे विनाकारण देवेंद्र फडणवीस वर टीका करू नका. देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी 14 कोटी जनतेच्या आशीर्वाद आहेत. ते स्वच्छ प्रतिमेचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना एक दोनदा नाहीतर तीनवेळा मुख्यमंत्री पद दिले. तुम्हाला मात्र जनता महापालिकेच्या वार्डातही निवडून देणार नाही, असे बन यांनी सुनावले.
17 हजार कोणी लूटले, मंदिर कोणी लुटले हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. राम मंदिर प्रकरणांत अपहार करणाऱ्यांकडून पैन पै वसूल केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. रोज शंभर कोटी रुपये वसुलीचे धंदे तुमच्या पक्षात होतात. संजय राऊत, तुम्ही सतरा हजार कोटींचा दाखला देताय. पण अडीच वर्षांत तुम्ही 90 हजार कोटी रुपयांची महाराष्ट्राची लूट केली त्याचा हिशोब आधी तुम्ही दिला पाहिजे, असेही बन यांनी नमूद केले.








