ठाणे ३० : अन्न डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोच्या वेशातील एका डिलिव्हरी बॉयसह दोन ड्रग्ज तस्करांना ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल ३ कोटी ९७ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या घटनेने ड्रग्ज तस्कर आता किती वेगवेगळ्या आणि अनपेक्षित मार्गांचा अवलंब करत आहेत, हे समोर आले आहे.
डिलिव्हरी बॉयच्या वेशात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश
ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २७ जुलै रोजी डायघर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी शीळफाट्याकडून दिवागावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळच्या वेळी एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे १ किलो ५२२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ ३ कोटी ४ लाख ७१ हजार रुपये किमतीचे हे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कळवा परिसरात दुसऱ्या तस्कराला अटक
दुसरी मोठी कारवाई ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने २४ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. भिवंडी-मुंब्रा रस्त्यावर एक तस्कर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकला मिळाली होती. यानुसार, पोलिसांनी खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचून एका संशयित कारचालकाला ताब्यात घेतले.
त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये ६६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. ९२ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे हे ड्रग्ज जप्त करून पोलिसांनी ड्रग्ज तस्कर शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (वय २८, रा. मंदसौर, मध्य प्रदेश) याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.








