spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नियमित लसीकरणापासून माता व बालक वंचित राहू नये

– लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा

– नियमित लसीकरण, सर्वेक्षण व आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत आढावा

– उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या नियमित लसीकरण कार्यक्रम, विविध रोग सर्वेक्षण उपक्रम तसेच सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यकारी समितीची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या उपस्थित पार पडली. बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, ,साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, मलेरिया व फालेरिया अधिकारी डॉ. मोनिका चारमोडे, पोलिओचे नोडल अधिकारी डॉ. मेघा जैतवार,एनयुएचएमचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, डॉ वर्षा देवस्थळें, एम.एस.यू चे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. मिथुन खेरडे, पी.एच.एन अर्चना खाडे, क्षेत्र लसीकरण नियंत्रण संदीप फुंडे, सोनल सियाग,  मोनाली बावनकर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी व तज्ज्ञ उपस्थिती होते.

बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पोलिओ बूथची कामगिरी ९३ टक्के झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून शत-प्रतिशत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा वेग वाढवून पात्र मुलींचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावे आणि जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिले.

नियमित लसीकरण सत्रांना झोनल वैद्यकीय अधिकारी व आरसीएच अधिकारी यांनी नियमित भेटी देऊन लसीकरण सत्रांचे निरीक्षण करावे, लाभार्थ्यांची पडताळणी करावी तसेच ओआरएस पॅकेटचे वितरण सुनिश्चित करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच एचआयएमएस आणि यु-विन पोर्टलवरील Full Immunized Entry मधील तफावत दूर करून एप्रिल ते मे २०२६ या कालावधीतील सर्व प्रलंबित नोंदी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

AFP Surveillance अंतर्गत संशयित रुग्णांचे नमुने वेळेत प्रयोगशाळेत पाठविणे तसेच संबंधित रुग्णालयांकडून साप्ताहिक अहवाल नियमितपणे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच MR (Measles-Rubella) Surveillance अंतर्गत संशयित रुग्णांचे आवश्यक नमुने (Adequate Specimen) संकलित करून VTM चा योग्य वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

Vaccine Preventable Diseases (VPD) Surveillance अंतर्गत झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या Active Case Surveillance (ACS) भेटींचे प्रमाण ७६ टक्के असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांनी नियमित घरभेटी व कुटुंब सर्वेक्षण पूर्ण करून ई-सुश्रुत (e-Sushrut) प्रणालीमध्ये नोंदणी वेळेत करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले. याशिवाय Quality Assurance Programme आणि कायाकल्प (Kayakalp) उपक्रमांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आरोग्य संस्थांनी आवश्यक निकषांची पूर्तता करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यावर भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

बैठकीच्या शेवटी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित आढावा, प्रभावी समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून लसीकरण, रोग सर्वेक्षण आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रत्येक अधिकाऱ्याने शासनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.