spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खैरीतील नाल्यात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ कायम

– शवविच्छेदनात बाह्य जखमेच्या खुणा नाहीत; अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी गावाजवळ फॉर्मेस फर्निचर कंपनीच्या शेजारी पाण्याने भरलेल्या नाल्यात आढळलेल्या अज्ञात पुरुषाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमेच्या खुणा आढळून आल्या नसल्याची माहिती पुढे आली असून, अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२ जुलै) सकाळी सुमारे ७.३० वाजता खैरी गावचे पोलीस पाटील अशोक पांडुरंग मानकर यांना नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ जुनी कामठी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला.

प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याचे समोर आले आहे. तसेच मृतदेह सुमारे तीन दिवसांपूर्वी नाल्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमेच्या खुणा आढळून आल्या नसल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या अंगावर काळ्या रंगाची फुल पॅन्ट, राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि कमरेला काळा पट्टा होता. त्याच्या खिशातून दोन देशी बिडीची बंडले आणि ₹२८० रोख रक्कम आढळल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत असून, अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles