– महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत सभापती सारिका नांदुरकर यांच्या सूचना
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विशेष समितीची बैठक सोमवारी (०६) पार पडली. समितीच्या सभापती सारिका नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अत्याधुनिक युगात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या कौशल्य विकासावर भर देण्याच्या सूचना सभापती सारिका नांदुरकर यांनी दिली.
मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत समितीच्या सदस्या तथा नगरसेविका महेश्वरी बिसेन, चेतना निमजे, रेखा निमजे, कल्पना द्रोणकर, तसनीम परवीन ताजी, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, जयश्री गडकर, विनय त्रिकोलवार नूतन मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सारिका नांदुरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला व मुलींना सक्षम करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी समितीने विविध कौशल्य आधारित उपक्रमांवर भर दिला. तसेच गरजू महिला आणि मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना ‘कम्प्युटर प्रशिक्षण’ आणि ‘हाऊसकीपिंग’चे प्रशिक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा मानस असल्याचे सभापती नांदुरकर यांनी सांगितले.
याशिवाय दिव्यांग व्यक्तींना प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘तीनचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल सायकल’ योजनेची अंमलबजावणी करण्यावर ही सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. तसेच, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘ई-रिक्षा वाटप’ योजनेचा आढावा घेण्यात आला. समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय महिला नगरसेविकांसाठी एक विशेष अभ्यासदौरा आयोजित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला, जेणेकरून विविध ठिकाणच्या चांगल्या उपक्रमांचा अभ्यास करता येईल. यावर उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मनपाद्वारे सुरू असलेल्या तीन क्लस्टर बद्दल माहिती देत समिती सदस्यांनी याठिकाणी भेट देण्याचे आवाहन केले.




