spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इतवारी रेल्वे पोलिसांची तत्परता; हरविलेल्या दोन चिमुकल्यांना काही तासांतच पालकांच्या स्वाधीन

कामठी :- इतवारी रेल्वे स्थानकावर हरविलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अवघ्या काही तासांत शोध घेत त्यांना सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करून इतवारी रेल्वे पोलिसांनी संवेदनशीलता आणि तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील सालीवाडा येथील रहिवासी दिलीप राघवीलाल बरखे (वय ३३) हे आपल्या कुटुंबासह कमानगाव (निमखेडा, ता. मावदा) येथे जाण्यासाठी ७ जुलै रोजी पहाटे इतवारी रेल्वे स्थानकावर उतरले होते. रेल्वे बदलण्याच्या गडबडीत त्यांची दोन्ही मुले – विवेक (वय १३) व अनुराग (वय १०) – गर्दीत हरवली.

घटनेची माहिती मिळताच इतवारी रेल्वे पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दोन्ही मुले रेल्वे स्थानकाबाहेर जाताना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत मुलांचा माग काढला. अखेर दोन्ही मुले अमरावतीकडे जाणाऱ्या बसमध्ये सुरक्षित अवस्थेत आढळून आली.

रेल्वे पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधला आणि इटवारी बसस्थानकावर त्यांची भावनिक भेट घडवून आणत मुलांना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली. या कार्याबद्दल रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.