– फडणवीस गृहखात्याची पूजा घाला : संजय राऊत
मुंबई :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांना बेदम मारहाण शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून करण्यात आल्यानंतर आरोग्य संघटनांमध्ये एकच आक्रोश पसरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना सुद्धा बेदम मारहाण केली. या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले असून म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी महानगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. तसेच तातडीने कारवाई करण्याची मागणी करत संपावर जाण्याचा सुद्धा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आला आहे.
आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला!
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता गृहखात्याची पूजा घाला अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सन्मानीय मुख्यमंत्री फडणवीसजी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला! ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी कोरोना काळात जनतेची सेवा केली, त्या महिला डॉक्टर आणि नर्स ना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात. हे काय कायद्याचे राज्य आहे? या सगळ्यांची हातात बेड्या घालून ,चड्डी बनियन वर वरात काढा! अशी मागणी केली आहे.
मित्रपक्षाची ही गुंडगिरी खपवून घेणार का?
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्वीट करत फडणवीस यांच्यावरती सडकून प्रहार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कृपया डॉक्टरांनी शेअर केलेला व्हिडिओ पहा, ‘फेकनाथ मिंधे’ टोळीतील एका नगरसेवकाने रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला केला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीएमओ आणि देवेंद्र फडणवीस आपल्या मित्रपक्षाची ही गुंडगिरी खपवून घेणार का? ‘मिंधे’ टोळीतील त्या गुंडाला अटक करतील आणि त्याचे नगरसेवकपद रद्द करतील का? की ते केवळ डॉक्टर आणि परिचारिकाच नव्हे, तर सर्वांनाच असा संदेश देतील की महाराष्ट्रात अशा प्रकारची अराजकता चालते आणि ती त्यांना मान्य आहे? अशी विचारणा त्यांनी ट्विटमधून केली आहे.
मारहाण कशासाठी झाली?
एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना जन्मानंतर बाळाला ‘एनआयसीयू’ (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) उपचारांची आवश्यकता भासू शकते, अशी पूर्वसूचना दिली. तसेच मात्र, शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स आधीच भरले असल्याने, बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर डॉक्टर आणि नर्सना बेदम मारहाण करण्यात आली.




