कामठी :- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडोदा ग्रामपंचायत येथील कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी दिनकर इंगळे यांची पंचायत समिती भिवापूर येथे विस्तार अधिकारी (पंचायत) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामपंचायत वडोदा व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
इंगळे यांनी मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात वडोदा ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या विविध कामांना गती मिळाली. त्यांच्या कार्यामुळे वडोदा ग्रामपंचायतीने विकासाच्या वाटचालीत वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या पदोन्नतीमुळे वडोदा ग्रामपंचायतीला एका कुशल, प्रामाणिक व लोकाभिमुख अधिकाऱ्याची उणीव भासणार असली, तरी भिवापूर पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच राजू थोटे, उपसरपंच दत्तू हलमारे, सदस्या अर्चना विशाल गाडबैल, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




