भंडारा :- शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना अनेकदा अनपेक्षित अपघातांना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात सर्पदंश, विंचूदंश, वीज पडणे, पाण्यात बुडणे, जनावरांचा हल्ला, रस्ते अपघात तसेच इतर दुर्घटनांचा धोका वाढतो. अशा संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून सन २०२५-२६ मध्ये (डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत) १२५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांना एकूण २१७.०० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे. यावरून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न दिसून येतो.
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. सर्पदंश, विंचूदंश, वीज पडणे, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे, उंचावरून पडणे, जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेला अपघात, रस्ते अथवा रेल्वे अपघात, जंतुनाशके हाताळताना झालेली विषबाधा तसेच शासनाने मान्य केलेल्या इतर अपघाती घटनांचा या योजनेत समावेश आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला अथवा अपंगत्वाचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, वारसदाराची नोंद, ओळखपत्र तसेच आवश्यकतेनुसार पंचनामा, प्रथम माहिती अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
यापूर्वी सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात १२२ अर्ज मंजूर करण्यात आले होते आणि त्यासाठी २४४.०० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अपघात घडल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेऊन संबंधित महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल. असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यांनी केले आहे.




