spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माय भारत नोंदणी मोहिमेत युवकांचा सहभाग वाढ – अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

– जिल्हा युवा सल्लागार समिती सभा संपन्न

– जिल्ह्यात माय भारत नोंदणी मोहीम सुरु ; युवकांनो सहभागी व्हा

यवतमाळ :- केंद्र सरकारची माय भारत नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा सल्लागार समिती सभा गुरुवारी पार पडली. या सभेला जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे, कार्यक्रम अधिकारी अनिल शेंडे, विविध विभागाचे अधिकारी व विद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.

या सभेत माय भारत वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण व अंमलबजावणी विषयी चर्चा करण्यात आली. दि. 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या माय भारत नोंदणी मोहिमेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची माहिती अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी घेतली. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, भारत स्काऊट गाईड, युवा मंडळ यांच्या माध्यमातून 15 वर्ष वरील वयोगटातील युवकांची माय भारत पोर्टलवर नोंदणी वाढविण्याचे निर्देश त्‍यांनी दिले.

जिल्ह्यातील युवक मंडळाचे सक्षमीकरण, नवीन युवा मंडळाची निर्मिती व माय भारत पोर्टलशी जोडणीच्या कामांना गती देवून युवकांचा सहभाग वाढवावा. वार्षिक कृती आराखडा 2026-2027 अंतर्गत प्रस्तावित विकसित भारत पदयात्रा, युवक मंडळ विकास मोहीम, क्रीडा संमेलन, नशामुक्त भारत, इ. कार्यक्रमाचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील विविध विभाग, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने युवा सहभाग वाढवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले.

‘माय भारत कॉलेज अॅम्बेसेडर’

प्रत्येक महाविद्यालयात एक प्राध्यापक माय भारत नोडल अधिकारी व एक विद्यार्थी ‘माय भारत कॉलेज अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

बैठकीच्या सुरुवातीला, जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाची उद्दिष्टे आणि रूपरेषा याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात माय भारत नोंदणी मोहीम सुरु असून जिल्ह्यातील युवकांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करुन सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Popular Articles