spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एसआयआर विशेष शिबिर ११ व १२ जुलै रोजी; मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे

खापा, वार्ताहर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत खापा नगर परिषदेमार्फत शहरातील सर्व मतदान केंद्रांवर दि. ११ जुलै २०२६ (शनिवार) व दि. १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी विशेष मतदार पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

या विशेष शिबिरामध्ये मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, छायाचित्र तसेच इतर तपशीलांची पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या व अद्ययावतीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने पात्र झालेल्या तरुण, तरुणी, नागरिकांसह सर्व मतदारांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरास उपस्थित राहताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (EPIC), जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी कोणतेही एक) तसेच दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यास पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेली मतदार यादी अचूक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहरातील सर्व पात्र मतदारांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या नावाची व तपशीलांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन खापा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे तसेच सर्व नगरसेवकांनी केले आहे.

प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादीतील त्रुटी कमी होण्यास मदत होणार असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन नगर परिषद द्वारा करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.