हंसराज,भंडारा :- अमली पदार्थ विरोधी मोहिमेत भंडारा जिल्हा पोलीस दलाने एक मोठे पाऊल उचलले असून, विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला सुमारे ७० लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३८६ किलो अमली पदार्थ आज, ९ जुलै रोजी नष्ट केला. नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलाने एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत १३ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आणि पॉपी स्ट्रॉ (अफू बोंडाचा चुरा) जप्त केला होता. यामध्ये ९ लाख ९६ हजार ८१५ रुपये किमतीचा सुमारे ८२ किलो गांजा आणि ६० लाख ९१ हजार ४०० रुपये किमतीचा ३०४ किलो पॉपी स्ट्रॉ अशा एकूण ७०,८८,२१५ रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेले आणि तपास पूर्ण झालेल्या प्रकरणांमधील हा साठा होता.
ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रारंभी भंडारा पोलीस मुख्यालयातील ड्रील शेड येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत सर्व मालाचे मोजमाप करून रीतसर पंचनामा करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांनुसार आणि त्यांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील अटींनुसार, हा सर्व मुद्देमाल कडक पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या बुटीबोरी येथील ‘महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ येथे नेण्यात आला. तेथे कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मस्के आणि पंचांच्या समक्ष, स्वयंचलित बॉयलर मशीनमध्ये हा सर्व अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी आणि युवा पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस दल अशा कारवाया सातत्याने करत असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.




