spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं झालं; जळगावमध्ये भेसळीचा कहर

जळगाव :- राज्यभरात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे संशयास्पद दूध विक्रीचा प्रकार समोर आला आहे. खासगी दूध डेअरीमधून खरेदी केलेले दूध घरी तापवल्यानंतर त्याचा पोत असामान्यरीत्या बदलून ते रबरासारखे ताणले जात असल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये दूधाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित दूधाची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी होत आहे.

माहितीनुसार, चोपडा येथील माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी शहरातील एका खासगी दूध डेअरीमधून दूध खरेदी केले. घरी नेल्यानंतर त्यांनी ते नेहमीप्रमाणे तापविण्यास ठेवले असता दूधाचा पोत बदलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, उकळल्यानंतर दूध नेहमीप्रमाणे दाट न होता चिकट झाले आणि चमच्याने उचलल्यावर ते रबरासारखे ताणले जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ चित्रीत केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दूधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, व्हिडिओतील दावे किंवा दूधामध्ये भेसळ झाल्याची बाब अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही. संबंधित दूधाची वैज्ञानिक तपासणी झाल्यानंतरच त्याबाबतचे निष्कर्ष स्पष्ट होऊ शकतील.

धनराज बाविस्कर यांनी या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दूरध्वनीद्वारे दिल्याचे सांगितले आहे. संबंधित दूधाचे नमुने तातडीने जप्त करून मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, तसेच दूधाच्या गुणवत्तेची आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा इतर पदार्थ मिसळले आहेत का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित डेअरी किंवा अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसून, तपास अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.