spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

9 वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला मृत्यू होईपर्यंत जन्मठेप

– 2014 मधील अक्कलकोट येथील घटना; पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली दोषी, 71 हजारांचा दंड

सोलापूर :- अक्कलकोट तालुक्यात २०१४ मध्ये ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा निकाल देताना आरोपी बापू सिद्धप्पा कुसेकर (रा. अक्कलकोट) याच्यावर ७१ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला अक्कलकोट परिसरातील एका निर्जन दगडाच्या खाणीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान पीडितेची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साक्षीपुरावे, तपास अधिकाऱ्यांची साक्ष तसेच इतर तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरविले.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेतील लागू तरतुदींनुसार दोषी ठरविले. त्यानंतर आरोपीला मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ७१ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली. न्यायालयाच्या या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांबाबत कठोर शिक्षा देण्याचा संदेश गेल्याचे कायदेवर्तुळात मानले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.