spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नियमाविरुद्ध प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

– महापौर निता ठाकरे यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक आस्थापना, शासकीय व निमशासकीय संस्था, पर्यटन, विवाह समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर विशेष प्रसंगांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार ‘कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ परवाना अंतर्गत खाजगी बस वाहतूक सेवा वैधानिक बाबींची पूर्तता करून उपलब्ध करून दिली जाते. मात्र, अनेकदा नियमांचे पालन न करता मनपा हद्दीत अवैधपणे प्रवाशांची वाहतूक केली जाते, ज्यामुळे शहर बस सेवा वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊन महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते. या समस्येवर आळा घालण्यासाठी मनपा, पोलीस वाहतूक (शहर व ग्रामीण ), आरटीओ (शहर व ग्रामीण )आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संयुक्तपणे कठोर कारवाई करावी, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.

या संदर्भात मनपा मुख्यालयातील महापौर सभाकक्ष शनिवारी (ता.11) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपमहापौर लिला हाथीबेडे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, अतिरिक्त आयुक्त अंकित कुमार , प्र. अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, मनपा परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, ऑपरेशन व्यवस्थापक राजीव घाटोळे, टिम लीडर विशाल कनोजिया व मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, नागपूर महानगरपालिका ही शहराच्या २० किलोमीटर क्षेत्रापर्यंत आणि एनएमआरडीए क्षेत्रात १० किलोमीटरपर्यंत प्रवासी वाहतूक सेवा पुरवते. परंतु, विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक आस्थापना व शासकीय/निमशासकीय संस्थांच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या बसेसद्वारे इतर सामान्य प्रवाशांची नियमबाह्य ने-आण केली जात आहे. हे कायद्याचे उघड उल्लंघन असून यामुळे मनपाच्या वाहतूक सेवेचे नुकसान होत आहे. अशा नियमबाह्य बस वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी वाहतूक पोलीस , आरटीओ आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याकरिता सर्व संबंधित विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय राखून संशयित बसेसची नियमित तपासणी करावी, तसेच अचानक विशेष तपासणी मोहीम राबवून अशा पद्धतीने वाहतुक करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देशही महापौर निता ठाकरे यांनी या बैठकीत दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.