कामठी :- शिक्षणाची गोडी वाढविण्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याच्या उद्देशाने लिबर्टी क्लासेस, कामठी यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वार्षिक ‘एक वही, एक पेन’ या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा संकलित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे रविवारी कामठी परिसरातील ३०० गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, शालेय दप्तर, पेन्सिल, रबर, शार्पनर आदी आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्यात आला.
या कार्यक्रमाला लिबर्टी क्लासेसचे संस्थापक रोशन जांबुळकर व सोनू जांबुळकर, तथागत बौद्ध विहार, कामठीचे आरजू कांबळे व अमित फुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लिबर्टी क्लासेसचे विस्मित मेश्राम व आकांक्षा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सातत्याने अभ्यास करण्याचे आवाहन केले आणि या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बबलू रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इशांत तिरपुढे, महेश राऊत, निशांत बन्सोड, नयन गजभिये, प्रणीत पाटील, मुकेश वैद्य, मानसी डोंगरे, सिद्धांत बागडे, विद्यानंद खोबरागडे, सतीश गणवीर, स्वाती पौनीकर, अपेक्षा सवाईथुल तसेच अश्वजित खोबरागडे यांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमासाठी ‘दस का दम ग्रुप’ यांनी शालेय दप्तरांचे, तर यश फाउंडेशन यांनी आर्थिक सहकार्य करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा ‘एक वही, एक पेन’ हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








