spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदारांच्या दारी जाण्याऐवजी मतदारांनाच पाचारण; कामठी तालुक्यात SIR मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

संदीप कांबळे,कामठी :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत प्रत्येक बीएलओने (बूथ लेव्हल अधिकारी) मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करून माहिती अद्ययावत करणे बंधनकारक असताना, कामठी तालुक्यात अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. घरभेटी देण्याऐवजी अनेक बीएलओ मतदारांना फोन करून किंवा निरोप पाठवून ठराविक ठिकाणी बोलावत असल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते २९ जुलैदरम्यान सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करणे, आवश्यक फॉर्मचे वाटप करणे आणि माहिती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक बीएलओ मतदारांना “फॉर्म घेऊन या, भरून द्या” अशा सूचना देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय अनेक मतदारांच्या नावात, वडिलांच्या नावात किंवा आडनावात त्रुटी आढळून येत असून, त्या दुरुस्त करण्यासाठीही मतदारांनाच वारंवार बोलावले जात आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, अनेक मतदार संभ्रमावस्थेत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी व्यक्ती आणि दुर्गम भागातील मतदारांसाठी ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत आहे.

मतदारांच्या घरी जाऊन सेवा देण्याऐवजी त्यांनाच बीएलओंच्या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, जागरूक मतदारांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व बीएलओंना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन फॉर्मचे वाटप, पडताळणी व माहिती संकलन करण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी होऊन एकही पात्र मतदार वंचित राहू नये, तसेच नागरिकांना अनावश्यक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी कामठी तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

– फाईल फोटो

Popular Articles