नागपूर ३१ : अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मिहिरची आई असलेल्या २३ वर्षीय निकिता विशाल डोंगरे हिचा अवघ्या १५ हजार रुपयांच्या मोहापायी दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. सदर येथील इंदिरा आयव्हीएफ (IVF) केंद्रावर या प्रकरणी गंभीर दोषारोपण करण्यात आले आहे. ही घटना शहरात स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटची शक्यता निर्माण करत आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, निकिताच्या शेजारी राहणारे आरोपी बादल देशभ्रातर आणि त्याची पत्नी प्रियंका देशभ्रातर यांनी निकिताला विश्वासात घेऊन तिला स्त्रीबीज दान केल्यास १५ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. पतीने विशालला याची कल्पना नसताना, निकिता १६ जुलैपासून सदर येथील इंदिरा आयव्हीएफ केंद्रात जात होती. १२ व्या दिवशी, म्हणजेच २७ जुलै रोजी, तिच्या गर्भकोषातून स्त्रीबीज काढल्यानंतर तिची प्रकृती अचानक ढासळली. तिचा रक्तदाब (blood pressure) खूप कमी झाला.
प्रकृती खालावल्याने निकिताला तातडीने मेडेट्रीना रुग्णालयात (Meditrina Hospital) पाठवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता तिचा मृत्यू झाला.
पतीला अंधारात ठेवून व्यवहार
बादल आणि प्रियंका यांनी २७ जुलै रोजी निकिताला स्त्रीबीज काढण्यासाठी इंदिरा आयव्हीएफ केंद्रात आणले, तेव्हा तिचा पती विशाल घरी झोपलेला होता. पतीला कोणतीही कल्पना नसताना १५ हजार रुपयांच्या मोहात निकिताला आपले प्राण गमवावे लागल्याने तिचा दोन वर्षांचा चिमुकला कायमचा आईच्या मायेला पारखा झाला आहे.
पोलिसांची प्राथमिक कार्यवाही
निकिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, तिच्या कुटुंबीयांनी प्रथम सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर कामठी पोलीस ठाण्यात गेले. त्यांना अखेरीस सदर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. सदर पोलिसांनी निकिताच्या अपघाती मृत्यूची (Accidental Death) नोंद करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) पाठवला आहे. गुरुवार, ३१ जुलै रोजी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. आजच निकिताचा पती विशाल आणि कुटुंबीयांना जबाब नोंदवण्यासाठी सदर पोलिसांनी बोलावले आहे.
‘स्त्रीबीज रॅकेट’चा संशय, काँग्रेस नेत्याची मागणी
या घटनेची माहिती मिळताच नागपूर शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम खान यांनी तात्काळ मेडिकल रुग्णालयात धाव घेतली आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली. तत्पूर्वी, वसीम खान यांनी निकिताचे पार्थिव घेऊन सदर पोलीस ठाणे गाठले आणि बादल, प्रियंका, संबंधित डॉक्टर्स तसेच इंदिरा आयव्हीएफ केंद्राविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी त्यांची आणि कुटुंबीयांची दोन तास वादावादी झाली. सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा ठाकरे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
निकीताच्या कुटुंबीयांना या घटनेने मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे शहरात स्त्रीबीज विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बादल आणि प्रियंका यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असल्याने, ते अत्यंत गरीब घरातील मुलींना कामाचे आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेत असल्याचा संशय वसीम खान यांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा आयव्हीएफ केंद्राकडून बादल आणि प्रियंकाला या कामासाठी प्रत्येक मुलीमागे एक लाख रुपये मिळत होते, त्यापैकी फक्त १५ हजार रुपयेच निकितासारख्या मुलींना दिले जात होते. सदर पोलिसांनी इंदिरा आयव्हीएफ केंद्रातील दोषी डॉक्टरांना अटक करून या स्त्रीबीज रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.








