spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शालार्थ आयडी घोटाळा: शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी, SIT ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

 

नागपूर ३१ : शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना पोलीस कोठडी न देता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

१०० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आदेश नसतानाही, ऑनलाइन शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शालार्थ आयडी (ID) तयार केले. या बनावट आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून शासनाची १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींचे थेट सहभाग

या घोटाळ्यात रोहिणी कुंभार यांनी २४४ बोगस शालार्थ आयडी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तयार केले आणि त्याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवली, असे स्पष्ट झाले आहे. तर, सिद्धेश्वर काळुसे याने १५४ बोगस आयडी तयार केल्याचे समोर आले आहे.

मुख्य आरोपी अद्याप फरार

या घोटाळ्यातील तिसरा मुख्य आरोपी निलेश वाघमारे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे.

SIT पोलीस उच्च न्यायालयात अर्ज करणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, SIT चे पोलीस अधिकारी उच्च न्यायालयात रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles