नागपूर ३१ : बुधवारी (३० जुलै २०२५ रोजी) सकाळी कळमेश्वर रोडवरील बोधला गावातील नहरी नागपुरे यांच्या शेतात एका पाच फूट लांबीच्या अजगराने जंगली ससा गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच अजगराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली.
या घटनेची माहिती ‘हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’ संस्थेचे सर्पमित्र बंटी गोडबोले आणि रितेश नारनवरे यांना मिळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत अजगराने ससा पूर्णपणे गिळला असल्याने सशाचा जीव वाचवता आला नाही. संस्थेच्या सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक त्या अजगराला रेस्क्यू केले आणि त्याला त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.
जे.डी. इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात अजगराची पिल्ले सापडली
दरम्यान, काटोल रोडवरील फेंटरी येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून सतत अजगराची पिल्ले आढळून येत आहेत. जे.डी. महाविद्यालयातून मंगेश रामगिरकर यांनी ही माहिती ‘हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर’चे सर्पमित्र बंटी गोडबोले यांना दिली. माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. कँटीन आणि इतर परिसरातून जवळपास एक फूट लांबीची पाच पिल्ले त्यांनी सुरक्षितपणे रेस्क्यू केली. या सर्व पिल्लांनाही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अजूनही अजगराची पिल्ले आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सर्पमित्रांनी सांगितले.
भारतीय अजगराविषयी महत्त्वपूर्ण माहिती
‘हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’चे स्वप्नील बोधाने यांनी भारतीय अजगराविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. भारतीय अजगराला ब्लॅक-टेल्ड पायथन किंवा इंडियन रॉक पायथन असेही म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव ‘पायथन मॉल्युरस’ (Python molurus) असून, अजगर हा साप बिनविषारी गटात मोडतो.
साधारणतः हा साप १३ ते १५ फूट लांबीपर्यंत वाढतो. हा साप सामान्यतः फिकट रंगाचा, तपकिरी, लालसर-तपकिरी, पिवळसर-तपकिरी आणि राखाडी-तपकिरी रंगांचा असतो. अजगर स्वतःच्या आकारानुसार उंदीर, पक्षी, लहान सरपटणारे प्राणी, माकड, डुक्कर, काळवीट, हरिण, ससे यांसारखे लहान-मोठे सस्तन प्राणी देखील खातात.
अजगर साप मार्च ते जून या कालावधीत अंडी घालतात. मादी अजगर एका वेळी १५ पेक्षा जास्त अंडी घालू शकते. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचा कालावधी सुमारे ५० ते ७० दिवसांचा असतो. भारतीय अजगर या सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार अनुसूची एकमध्ये (Schedule I) समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे तो एक संरक्षित प्राणी आहे.




