spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धक्कादायक! नागपुरात १० हजारांहून अधिक चेंबर उघडेच, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

नागपूर ३१ : शहरातील रस्ते आणि पदपथ सध्या मृत्यूचे सापळे बनले आहेत. सिव्हरेज आणि गटार लाईनवरील तब्बल १० हजारांहून अधिक चेंबरची झाकणे तुटलेली किंवा पूर्णतः उघडी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यात ही उघडी चेंबर्स दिसत नाहीत, त्यामुळे कोणत्याही क्षणी नागरिक किंवा प्राण्यांचा जीव जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, या अत्यंत गंभीर समस्येकडे नागपूर महानगरपालिका प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यातील जीवघेणे सापळे

दरवर्षी पावसाळ्यात नागपुरातील अनेक रस्ते अक्षरशः तलावात रूपांतरित होतात. नागरिकांचे हाल, वाहनांचे नुकसान आणि अपघातांचे प्रमाण वाढते, हे चित्र नागपूरकरांसाठी नवे नाही. महापालिकेला याची पूर्ण माहिती असूनही, उघड्या चेंबरबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

पूर्वी बसवलेली लोखंडी झाकणे मोठ्या प्रमाणावर चोरीला गेली. त्यानंतर लावलेली सिमेंटची झाकणेही चोरट्यांनी फोडून त्यातील लोखंड काढून नेले. यावर उपाय म्हणून महापालिकेने फायबर मिक्स आणि एसएफआरसी (SFRC) झाकणे बसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पोलीस तक्रारी, योजना आणि निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्या, परंतु हे निर्णय केवळ कागदावरच राहिले आहेत. रस्त्यांवरील हजारो चेंबर्स आजही उघडीच असल्याने पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पदपथावरून चालणेही नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे.

१५ कोटींचा निधी मंजूर, तरी काम रखडले

महापालिकेने या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक झोनसाठी १.५ कोटी रुपयांच्या दराने, म्हणजेच दहा झोनसाठी एकूण १५ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली होती. या निधीतून १० हजार सिव्हरेज व ड्रेनेज चेंबरसाठी नवीन झाकणे बसवण्याची योजना आखण्यात आली होती. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असूनही, आजतागायत एकाही झोनमध्ये या कामाला सुरुवात झालेली नाही, हे आश्चर्यकारक आहे.

महापालिका प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागपूरकरांना दरवर्षी पावसाळ्यात या जीवघेण्या चेंबरचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Popular Articles