spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कर्मसंन्यासी पार्डीकर मावशी

म.पां देव स्मृती लोकांची शाळा, या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती रेखा पार्डीकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. कर्तृत्ववान, करारी, संयमी आणि मितभाषी असे व्यक्तिमत्व… त्यामुळे शिक्षकांना आदर आणि विद्यार्थिनींना आदरयुक्त धाक, भीती होती. शाळा संपकली की मुख्याध्यापक पद शाळेत ठेवून त्या आमची मावशी होत असत आणि आम्ही तिच्या मुली.

समाजाकडून काहीही अपेक्षा न ठेवता सतत समाजाला काही न काही देणारी आणि त्याचा अहंकारही न वाटणारी, कधी लोभ नाही, कुणाबद्दल मत्सर नाही. सतत आमची असणारी मावशी चटकन निघून गेली. वार्धक्याशिवाय काहीही नाही. पण जाताना जीवाला चटका लावून गेली.

94 वर्षातील अर्धा प्रवास तिने एकटीनेच केला. अनेक संकटे पचवली. हाताशी आलेला 25 वर्षाच्या प्रशांतचा मृत्यू अगदी डोळ्यादेखत बघितला. काही दिवसांनी कै. मनोहर काकासुद्धा गेले; आणि मावशी खचली. पण आयुष्याला धैर्याने तोंड दिले. बरेच दिवस बहीण-भाऊ सोबतीला होते. पण ते त्यांच्या घरी. लहान भावंडं गेल्याने तिला सावरायला वेळ लागला. पण आला दिवस  हसतमुखाने काढणे, घरातील भाचे, पुतणे यांच्या कार्यात मदत करणे, आनंद घेणे आणि देणे, सगळ्यांना आपलसं करणे, हा तिचा स्वभाव. इतक्या वर्षानंतरही माझे माहेरपण तिच्यामुळे टिकून आहे. सगळ्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तिने प्रेमाने बांधले होते. समाजसेवा आणि समाज सेवेचा वारसा लाभलेल्या मावशींनी बरीच वर्षे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे काम केले. भावाची मुलं, बहिणीची मुलं, पुतणे यांच्यावर खूप माया केली. गरजूंनाही मदत केली. अनेक संस्थांना तिने सढळ हाताने मदत केली. त्यामध्ये वनवासी कल्याणाश्रम, भारतीय शिक्षण मंडळ, विवेकानंद मेडिकल मिशन, लोकांची शाळा, शिशु ज्ञान मंदिर, अहिल्या मंदिर, विद्याभारत, सावरकर स्मारक समिती, धर्मजागरण, केशव गोरक्षण मंगरुळनाथ, माधव नेत्रालय, भाऊजी दप्तरी ट्रस्ट, गीता प्रबोधिनी या संस्थांना उदार मनाने मदत दिली. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेने त्यांनी आमच्यासमोर आदर्श ठेवला. चि. श्री. विजय, संजय आणि अजय ही त्यांच्या बहिणीची मुले असली तरीही त्यांचीच होती. शेवटपर्यंत त्यांनीच केले. त्यांनी कुटुंबे अगदी नातवंडामध्येही हेच प्रेमाचे संस्कार रुजविले. असा माझाही अनेक वर्षांपासून असलेला ऋणानुबंध अधिकच दृढ झाला. कर्मातूनही अलिप्त होऊन संन्यासी कसे राहावे, याचा धडा आम्हाला शिकविणारी मावशी आज आमच्यात नाही. आज तिचा चौदावा दिवस. म्हणून तिला आदरांजली. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवा, ही त्याचे चरणी प्रार्थना.

‘‘ऋणानुबंधाची फुलं कधी कोमेजत नाहीत.

आठव सुगंधाने ती अधिकच दरवळत असतात.’’

 –   माधुरी दिवाकर जोशी

Popular Articles